जर मी दारू प्यायलो तर, काय करेन ठाऊक नाही.
उभा राहायचे भान तरी असेल काय, माहित नाही.
लहानपणीच कळले मला, दारू वाईट पेय असते.
तब्येत खराब, घर खराब, जवळच्यांना दूर नेते.
व्यसनापाई पैसा जातो, व्यसनापाई शुद्धी जाते
निष्काम राहून, भांडण होऊन, घरच सारे गहाण पडते.
कॉलेज मध्ये शिकतांना पण, दारूचा जरा आग्रह झाला.
पण मी राहिलो स्थिर, म्हणालो "नाही त्याचा छंद कशाला?"
treat वर कधी गेलो असता, टुन्न होणे झाले नाही.
जर मी दारू प्यायलो तर, काय करेन ठाऊक नाही.
दारू पिऊन, टुन्न होऊन, लोकच कसे बदलून जातात.
कधी गातात, कधी रडतात, आणि कधी हरवून जातात.
काही जरा पचवलेले, तसेच ताजेपण भासवतात.
"मैने तो पिया हि नही", म्हणून प्रचंड भपकारा सोडतात.
आजवर काहींना रस्त्यावरती, उपडा झोपलेलं पाहिलंय.
आणि काहींना खरोखर "गटारात" निद्रादेवी आलीये.
एकास शिक्षा होऊनसुद्धा, दारू सोडणे जमलेच नाही.
जर मी दारू प्यायलो तर, काय करेन ठाऊक नाही.
कॉलेज च्या अखेरी मित्र, दारू पिउन बसले होते
आठवणी उजळत बसले होते, बोलून मोकळे होत होते
कोणी रडत बसले होते, आक्रोश कोणी करीत होते.
कोणी फाजिल बोलत होते, पण मन मोकळे करीत होते.
"जाऊदे, तो पिउन बसलाय", म्हणून लोकही "लाइट" घेत होते.
पण त्या निमित्ताने का होईना, पण मन त्यांचे मांडत होते.
पण अशी मित्रांची गम्मत पाहून, मला मात्र प्रश्न पडला
मनात साचला गाळ कधी, काय मी लोकांसमोर मांडला?
आज असा विचार करतो कि, कधी मनातले बोललोच नाही.
तोंडाला सारखा "फिल्टर" लावून, अर्धे मन कोंडून ठेवी.
भीती वाटते आजही मला, कि लोक काय समजतील.
मनातील सारे बोलून कधी, मलाही काय "लाईट" घेतील?
आजही शपथ आहे माझी, कि दारूला कधी शिवणार नाही.
जमल्यास मरेपर्यंतसुद्धा, पण शपथ माझी अटळ राहील.
पण आज वाटते, जर मी प्यालो, "फिल्टर" काय मी मोडला असता?
माझ्या इच्छा, माझे दुःख, बांध काय मी तोडला असता?
घातला असता कुठे मी राडा, कोणाला शिव्या दिल्या असत्या?
कोणाला बोलून, मोकळे होऊन, प्रश्न कधी सोडवला असता?
पण "जर तर" च सोडून देतो, काय आहे खात्री त्याची...
सध्या इथेच थांबतो...
म्हणतात ना, "झाकली मूठ सव्वा लाखाची"
:)
- अमेय
nice one randu...
ReplyDeleteAwesome...
ReplyDeleteAwesome
ReplyDeleteJhakas kavita!!! Maja aala :)
ReplyDeleteAwesome hai yeh ranade. Good job. :)
ReplyDelete-Hemendra